January 2020
चिनी लोकांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे चिनी नववर्ष (Chinese New Year) त्याला CNY असं संबोधितात.जसं भारतात आपण दिवाळी हा सण सर्वात उत्साहाने साजरा करतो.तसेच चिनी लोक नववर्ष साजरे करतात.यावर्षी चिनी नववर्ष हे २५ जानेवारीला आहे.मागच्या वर्षी आम्ही या नववर्षाच्या दरम्यान आलो होतो तर माझ्या नवऱ्याच्या युनिव्हर्सिटी मध्ये एकदम शुकशुकाट!कुणीच दिसेना!आम्हाला वाटलं इतकी मोठी युनिव्हर्सिटी आणि कोणी विद्यार्थी नाहीत ?
पण मग नवरा जॉईन झाल्यावर कळलं की त्यांना नववर्षाच्या सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून सगळे आपापल्या घरी परत गेलेत.आम्हाला हे खूप नवीन होत.असं म्हणता येईल की शांघायला आल्यावर आम्हाला हा पहिला कल्चरल शॉकच होता.आता तुम्ही म्हणाल सुट्ट्या होत्या त्यात काय विशेष?अहो पण सुट्या फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हत्या तर सगळ्यांनाच होत्या.दुकाने बंद,भाजी बाजार बंद,कुरिअर सेवा बंद,इंडियन स्टोअर बंद,आम्ही ज्या व्यक्तीकडून पाणी मागवतो तो पण जातो सुट्टीवर!सर्व कामगारांना,युनिव्हर्सिटीला महिनाभर सुट्टी असते आणि हा जो बाकीचा कामगार वर्ग आहे यांना किमान १० दिवस तरी नक्की सुट्टी असते.फक्त मॉल्स आणि मोठे सुपरमार्केटस् उघडे असतात.म्हणजे आम्हाला १० दिवस लागणाऱ्या वस्तू आधीच घेऊन ठेवाव्या लागतात.
तर हे सगळं का? याचं उत्तर म्हणजे जसं मी म्हणाले हा सण फार मोठा असतो.या सणाला सगळे आपल्या मूळगावी जाऊन आपल्या परिवारासोबत साजरा करतात.इथे ही प्रथाच आहे.या दरम्यान तिकिटं खूप महाग होतात सर्वत्र गर्दी असते पण तरीही कितीही महाग असो,कितीही खर्च होवो,कशाही परिस्थितीत पण आपल्या घरी जायचं आहे ही भावना असते त्यामुळे ही प्रथा कुणी मोडत नाही.