January 2022
जानेवारी महिना आपल्याला स्वप्नं दाखवतो तर डिसेंबर महिना वास्तवाची जाणीव!
नवीन वर्ष जवळ यायला लागले की सगळीकडे नवीन संकल्पांचे वारे वहायला लागतात.जुन्याच संकल्पांवरची धूळ झटकून त्यांना नव्या अवतारात पुन्हा जोमाने आणले जाते.एक तारखेपासून व्यायाम चालू करणार,व्यसने सोडणार,जोरात अभ्यास करणार,कामात जास्त लक्ष देणार यासारख्या ‘क्लिशेड’ संकल्पांपासून ते आवडत्या मुलीला प्रपोज करणार, आवडत्या ठिकाणी फिरायला जाणार,एखादा छंद जोपासणार इतकी याची रेंज असते.जिम्सच्या,डायटीशीयन्सच्या बिझनेसचा पिक पिरियडही हाच.
आता तर या संकल्पांचा फोलपणा इतका जाणवू लागलाय की साधारण डिसेंबर महिना चालू झाला की सोशल मीडिया,मित्रांच्या कट्ट्यावर याविषयीचे जोक्स,मिम्स व्हायरल व्हायला सुरुवात होते.चेष्टेने एकमेकांना मग,’यावर्षीचे काय नवीन संकल्प?’असे विचारले जाते.पण गेली दोन वर्षे संपूर्ण जगाने न भूतो आणि भविष्यती तर नकोच असे रोगाचे थैमान बघीतले.करोडो लोक यात होरपळून निघाले,मृत्युमुखी पडले पण यात एक गोष्ट मात्र जगभर स्पष्ट झाली की ज्यांची मुळातच तब्येत चांगली आहे ते तरून गेले.स्वतःला फिट ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे.फक्त शरीर नाही तर त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यही टिकवून ठेवायला हवे ही जाणीवही हळूहळू होते आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका सामाजिक संस्थेने केलेला एक सर्वे वाचनात आला.यात ‘२०२२ साठी तुमचा काय संकल्प आहे?’हा प्रश्न विचारला गेला होता.त्या सर्वेनुसार साधारण ७५% लोकांचे उत्तर हे ‘तब्येत उत्तम ठेवणार,इम्युनिटी वाढवणार’असेच होते.