April 2024
नमस्कार
सर्व प्रथम नवीन वर्षाच्या गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बिइंग वुमनच्या या अंकात सर्वांचे हार्दिक स्वागत. वाचन करणे, प्रवास करणे, विद्वान लोकांशी मैत्री यामुळे ज्ञान वाढते हा एक श्लोक ऐकला होता पण सध्याची परिस्थिती बघितली तर वाचन करणं जवळजवळ नष्ट झाले आहे. १५/२० वर्षांपूर्वी जी अडीचशे ते तीनशे मासिक निघायची त्यापैकी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आता छापली जातात. आता आपलेच बघाना आपण सुद्धा डिजिटल अंक काढतो आहे. परंतु हातात पुस्तक घेऊन डिजिटल अंक वाचणे यामध्ये खूपच फरक आहे. आणि त्या संबंधीचा एक लेख या अंकामध्ये आपण घेतलेला आहे. खरोखर पुस्तक वाचनाची आवड अशी आवड एका दिवसात कशी निर्माण होईल? त्यासाठी पुस्तक वाचल्यामुळे काय फायदे होतात किंवा ते वाचताना तुम्हाला कुठला आनंद मिळतो हे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवायला पाहिजे.