Being Woman

गझल

‘गझलियत 3’

गझलची एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही परिभाषा आपण सोप्या शब्दात समजून घेऊ. गझलच्या पहिल्या शेरला ‘मतला’ म्हणतात. मतल्यामध्ये दोनही मिस-यांमध्ये काफिया(यमक) व रदीफ(अंत्ययमक) असतात. पुढील शेरांमध्ये काफिया व रदीफ फक्त सानी मिसऱ्यामध्ये म्हणजेच शेराच्या दुसऱ्या ओळीत असतात.मतला ऐकताच रसिकांना गझलचे वृत्त (मीटर), काफिया, रदीफ यांची ओळख होते. त्याचवेळी जाणकार रसिक पुढील कवाफी काय काय असू शकतील याचाही अंदाज बांधतात. यालाच गझलची जमीन असे म्हणतात.

काफिया या अरबी शब्दाचा अर्थ आहे, मागे चालणारा, पुनःपुन्हा येणारा. काफिया हा शब्द पुल्लिंगी शब्द असून त्याचे अनेकवचन कवाफी असे आहे. काफिया हा गझलचा प्राण आहे. काफियाशिवाय गझल असूच शकत नाही.
रदीफ या अरेबिक शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ घोडा किंवा उंटावर आरुढ असलेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती आणि दुसरा अर्थ गझलमधील काफियाच्या नंतर येणारा शब्द किंवा शब्दसमूह. रदीफ कधीच बदलत नसतो. तो काफियाच्या नंतरच येतो. काही गझलमध्ये रदीफ नसतो. अशा गझलेस गैरमुरद्दफ गझल असे म्हणतात. गझलेच्या शेवटच्या शेरात गझलकाराने आपले नाव/टोपणनाव (तखल्लुस) गुंफल्यास त्याला ‘मक्ता’ असे म्हणतात. आपल्या मराठी अभंगात जसे तुका म्हणे, एका जनार्दनी, नामा म्हणे असे शेवटी असते तसेच आहे हे. यामुळे ती रचना कोणाची हे समजते.

आता या सर्वांचा आपण उदाहरण घेऊन अर्थ समजून घेऊ म्हणजे ही परिभाषा अधिक स्पष्ट होईल.पूल बांधण्यामध्येच जाते जीवन सरून हल्ली आठवणींचे पात्र वाहते दुथडी भरून हल्ली तुझ्याकडे धाडावे म्हणतो उपचारांसाठी मन होतच नाही बरे बिचारे काही करून हल्ली ‘बेफिकीर’ मृत्यू ना येवो क्षणात या भीतीने सवयीसाठी क्षणाक्षणाला बघतो मरून हल्ली यात पहिला शेर मतला आहे. हल्ली हा रदीफ(अंत्ययमक) आहे तर सरून, भरून, मरून हे कवाफी आहेत. दुसऱ्या शेरात पहिल्या ओळीत रदीफ काफिया नाहीत. रदीफ काफिया शेराच्या दुसऱ्या ओळीत आहेत. ‘करून’ हा काफिया दुसऱ्या शेरात आहे. त्याच्यापुढे ‘हल्ली’ हा न बदलणारा, पुनःपुन्हा येणारा रदीफ असलेला शब्द आहे. शेवटच्या शेरात ‘बेफिकीर’ हा तखल्लुस वापरला आहे. ‘बेफिकीर’ हे ज्येष्ठ गझलकार भूषण कटककर यांचे ‘तखल्लुस’ (उपनाम) आहे.

हल्ली हा एकच शब्द वरील उदाहरणात रदीफ होता.दुःख आता छळत नाही हे खरेतर दुःख आहे सौख्य खोटे खुपत नाही हे खरे तर दुःख आहे गोठल्या संवेदना की पारखा झालो मला मी मन कुठेही रमत नाही हे खरे तर दुःख आहे सदानंद डबीर यांच्या वरील गझलेत ‘नाही हे खरे तर दु: ख्ख आहे’ हा मोठा शब्दसमूहच रदीफ आहे. यावरून लक्षात येईल की रदीफ अगदी एकाक्षरी शब्द ते एखादे वाक्य असे काहीही असू शकतो.अलामत हा शेरातील काफियाच्या बाबतीतला एक महत्त्वाचा घटक! त्याबद्दल अधिक पुढील भागात.

स्वाती यादव.

 

Share :