Being Woman

blog img

‘सुप्रिया बडवे इंटरव्ह्यू’

      “बेस्ट विमेन एंटरप्रिन्युअर पारितोषिक”, “रोटरी पारितोषिक”, चार वेळा आंतरराष्ट्रीय जपानमधील “जेआयपिएम् पारितोषिक” विजेत्या, बडवे इंजिनिअरिंग ग्रुपच्या एकक्सिक्युटिव्ह डायरेक्टर अशी ओळख असलेल्या ‘सुप्रिया बडवे’.  इंजिनिअरिंग सारख्या पुरुषप्रधान क्षेत्रातही, महिलांची घोडदौड पाहून खूपच समाधान वाटले.  बडवे इंजिनिअरिंग ग्रुप ही शीटमेटल फॅब्रिकेशन, प्लॅस्टिक प्रोसेसिंग, सरफेस ट्रीटमेंट, हेल्मेट मॅन्युफॅक्चरिंग आणि फ्लॉरिकल्चर अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारी, संपूर्ण देशात वीस मॅन्युफॅक्चरिंग प्लांन्टस् असणारी, साधारण तीन हजार नऊशे इतका स्टाफ सांभाळणारी कंपनी आहे. सुप्रियामॅडम एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी लिलया सांभाळत आहेत. 

      मध्यमवर्गीय घरात जन्म, ऊत्तम संगोपन, आई-वडीलांचे प्रेम व संपन्न संस्कार, चांगल्या प्रकारचे शालेय व महाविद्यालयीन जीवन असे वातावरण त्यांना मिळाले. भौतिकशास्त्रात एम्.एस्.सी. केल्यानंतर, त्यांनी एल्आयसी मध्ये काही काळ नोकरी केली. लग्न व नंतर मुले झाल्यानंतर मुलांकडे लक्ष देण्यासाठी नोकरी सोडली.  पुढे त्यांनी पति श्री. श्रीकांत बडवे यांनी सुरु केलेल्या घरच्या व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बडवे इंजिनिअरिंगचे औरंगाबादमध्ये छोटे युनिट होते. मॅडमनी कंपनीत काम करायला सुरुवात केली व पुढे जाऊन त्यांनी व त्यांचे पति श्री. श्रीकांत बडवे यांनी या कंपनीचा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विस्तार केला. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कंपनीला ‘क्वालिटी प्रॉडक्टस् राष्ट्रीय पारितोषिक’, ‘आंत्रप्रेनरशिप राष्ट्रीय पारितोषिक’, ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे राष्ट्रीय पारितोषिक’ अशी पारितोषिके मिळाली आहेत. केवळ इंजिनिअरींगच्या क्षेत्रातच नव्हे, तर फ्लॉरिकल्चरच्या क्षेत्रातही कंपनी काम करते आहे. फुले निर्यात क्षेत्रात ती काम करते.

      व्यवसाय यशस्वीतेचे रहस्य काय असे विचारले असता सुप्रिया मॅडम ‘आमचे मध्यमवर्गीय संस्कार’ असे उत्तर देतात. “जमीनीवर रहा! मिळालेला पैसा हा जपून वापरा!! पैसा योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीनेच खर्च करा!!!” ही त्रिसुत्री आमच्या यशाचे रहस्य आहे.

       सामाजिक क्षेत्रातही कंपनीचे योगदान उल्लेखनीय आहे. आपण ‘सामाजिक बांधिलकी’ ही फ्रेज कशी घेता असे विचारले असता मॅडमनी सांगितले, की ‘जे यश आम्हांला मिळाले आहे त्यावर समाजाचाही अधिकार आहे’ या मानण्यातूनच आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवतो व समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. १० वर्षांपूर्वी श्री. श्रीकांत बडवे यांच्या वाढदिवसानिमित्त कंपनीने दहा हजार झाडे लावली. त्या झाडांची नीट काळजी घेत ती जगवली आहेत. ‘पुढील पिढीसाठी वेल्थ जनरेट करत असतांनाच त्यांच्या हेल्थचीही काळजी घ्यायला हवी. आपला देश २०२५ पर्यंत युवादेश होईल, तर त्यांच्यासाठी ऑक्सिजन अपूरा पडू नये म्हणून विशेष काळजी घ्यायला हवी’ असे सुप्रियामॅडम आवर्जून सांगतात. यासोबतच कंपनीतर्फे दरवर्षी ब्लड डोनेशन कॅंप आयोजित केले जातात. याबरोबरच डायबेटीस अवेअरनेस प्रोग्रॅम्स, कार्डिऑक अवेअरनेस प्रोग्रॅम्स असे अनेक उपक्रम त्या राबवतात. नुकतेच त्यांनी चाकण जवळील एका आठशे लोकसंख्या असलेल्या गांवात संपूर्ण हेल्थ चेकअप् कार्यक्रम घेतला होता. 

        त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारा एक युवा-इंजिनिअर पावसाळी सहलीला गेला असतांना वाहून गेला व म्हणून त्यानंतर त्यांनी या युवा पिढीसाठी-विचार-अभ्यासासाठी-सुरक्षितता कार्यक्रम व कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. त्याद्वारे सोळा हजार विद्यार्थी व युवकांना पाणी संबंधित सुरक्षितता कशी पाळायची याचे ट्रेनिंग दिले आहे. त्यांचे पुढील लक्ष्य म्हणजे पंचवीस हजार मुलांपर्यंत हा सिक्युरिटी प्रोग्रॅम पोहोचवणे हे आहे! 

        मॅडमनी नुकतेच ‘स्पोर्टस्-इंडी’ या नांवाने एक स्पोर्टस् व्हेंचर सुरु केले आहे. त्याद्वारे अनेक ऊत्तम खेळाडू व टीमला ओळख मिळावी हा त्यामागील उद्देश आहे. एक क्रिकेट सोडले, तर असे अनेक खेळ आहेत, की ज्यामध्ये जागतिक स्तरावर पराक्रम गाजवणारे खेळाडू आहेत. परंतु त्यांना म्हणावी त्या प्रमाणात प्रसिद्धी, मानसन्मान व ओळख मिळत नाही. एक खेळाडू घडतांना त्याला ट्रेनिंग देणारा कोच, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ञ, काऊंसिलर अशा अनेकजणांचे त्याच्या करिअरमध्ये योगदान असते.  परंतु या टीमला त्यांचे हक्काचे कौतुक मिळत नाही. यासाठी त्यांनी या वेबपोर्टलची निर्मिती केली आहे. यामागची प्रेरणा काय असे विचारता मी स्वत:  ऍथलीट होते व स्टेट लेवल पर्यंत खेळले आहे. माझे कुटुंबियही खेळाडू होते म्हणून खेळासाठी काही करण्याच्या तीव्र इच्छेतून, या संकल्पनेचा जन्म झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 

     व्यावसायिक यशाबरोबरच मॅडमनी आपले कौटुंबिक जीवनही छान सांभाळले आहे. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. व्यवसायाच्या वृद्धीसाठी पुढील पिढीही त्यांनी सक्षम बनवली आहे. ‘इंडीपेंडंट व स्ट्रॉंग आईच आपल्या मुलांना इंडीपेंडंट व स्ट्रॉंग बनवते!’ ही उक्ती त्यांनी सार्थ ठरवली आहे. या सगळ्याचे श्रेय त्या आपले पति, आई-वडील, आपली मुले व सासुबाई-सासरे यांना देतात. पतिने आपल्या बरोबरीने कामाची संधी दिली, आईवडीलांनी शिक्षण व मध्यमवर्गीय संस्कार दिले, मुले समजुतदार आहेत व सासुबाईंनी मुलांच्या संगोपनात साथ दिली, म्हणूनच आज मी माझ्या करिअरमध्ये या एवढया मोठ्या प्रमाणावर झेप  घेऊ शकले, हे त्या आवर्जून सांगतात. त्यातून त्यांचे संवेदनशील व संस्कारी मन दिसते.

     खूप छान मनमोकळ्या गप्पांनंतर मॅडमनी बिइंगवुमनला मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या आणि तुमचे हे ‘बिइंगवुमन पाक्षिक’ लवकरच जागतिक स्तरावर जावो या सदिच्छा दिल्या.

शब्दांकन – संजीवनी दीपक घळसासी, पुणे.

२७/०७/२०२०    

Share :