बदलत्या काळाबरोबर आज असंख्य क्षेत्रात महिलांनी स्वतःच्या कार्य कर्तृत्वातून एक वेगळा ठसा उमटविला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु अशा महिलांच्या यशस्वीततेची कथा ही अनेकांना प्रेरणादायी ठरते. म्हणूनच टीम बिइंग वुमन अशा काही निवडक महिलांची सामन्यातील असामान्य “ती” ची कथा’ घेऊन येत आहे.
सुनेत्रा मंकणी माहेरच्या मिरासदार. थोर साहित्यिक द. मा. मिरासदार यांची कन्या. घरातील वातावरण साहित्यिक कदाचित त्यामुळेच असेल त्यांचा साहित्याकडे ओढा वाढत गेला. लेखन, वाचन आणि मराठी साहित्यावर प्रभुत्व हे जणू त्यांना, त्यांच्या वडिलांकडून मिळलेलं बाळकडूच. जीवनातील वेगवेगळ्या वळणावर, अनेक अडचणींवर मात करत, त्यांनी यश संपादन केले आहे. काळाबरोबर मीडियाची क्षेत्र अर्थात माध्यम बदलतात परंतु त्यांचे महत्त्व कमी होत नाही हे त्या निक्षून सांगतात. प्रिंट मीडिया, ऑडिओ व्हिजवल अशा अनेक गोष्टींनी आज जाहिरात क्षेत्र व्यापून टाकले आहे. अशा या झटपटीने बदलणाऱ्या मीडियामध्ये गेली 34 वर्षे यशस्वीपणे कार्यरत आहेत. ‘रविराज पब्लिसिटी’ जाहिरात क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गेली 54 वर्षे कंपनी या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य देत आहे. जाहिरात क्षेत्रातील वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेत, त्याला नाविन्यपूर्णतेची साथ देत, मीडियामधील वेगवेगळ्या माध्यमातून, त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. प्रिंट मिडियापासून ते इव्हेंट पर्यंत सर्वच सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर देत या सर्व गोष्टी त्यांच्या कंपनीमध्ये चालू केल्या. क्लायंटच्या व्यवसायाची गरज ओळखून, त्यानुसार त्याला योग्य त्या मिडियाद्वारे कशा पद्धतीने जाहिरात करून देऊ शकतो यावर त्या नेहमी भर देत असतात. वेगवेगळ्या संकल्पना, विविध माध्यमे या सर्वच गोष्टी त्या कटाक्षाने पाळत असतात.
सतत नाविन्यपूर्णतेचा शोध, कलेची उत्तम जाण आणि मुख्य म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सर्वस्व पणाला लावून काम करण्याची तयारी या मुळेच आज त्यांनी हा व्यवसाय एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. इतकंच नव्हे तर अनेक नावाजलेल्या कंपन्यांसाठी त्यांनी शेकडोहून अधिक रेडिओ जाहिरातींचे लेखन, संकलन केले आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून अनेक व्यवसायांच्या जाहिरातींचे लेखन, दिग्दर्शन त्यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे. मराठी लेखन हा तर त्यांचा विशेष हातखंडा असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या कंपनीला सलग तेरा वर्षे RAPA चे पारितोषिक मिळाले आहे. या व्यतिरिक्तही जाहिरात क्षेत्रातील अनेक पुरस्कारांवर रविराज पब्लिसटीचे नाव कोरले गेले आहे.
मीडियाच्या विविध माध्यमातून सर्वोत्तम सेवा देणे हे कार्य आजही तसेच चालू आहे. हा व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी त्यांच्या आवडी – निवडी, छंद अत्यंत उत्तमरीत्या जोपासले आहेत.
एक उत्कृष्ट गृहिणी ते यशस्वी उद्योजिका हा सुनेत्रा मंकणी यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्याला टीम बिइंग वुमनचा सलाम आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
सध्याच्या तरुणाईला त्यांनी दिलेला एक छोटसा संदेश -“कोणत्याही क्षेत्रात जायचे असल्यास ते क्षेत्र आवडते का? माझी शारीरिक बौद्धिक क्षमता आहे का? त्या क्षेत्राला भविष्य आहे का? अशा काही प्रमुख बाबींचा विचार जरूर करावा”.
सुनेत्रा मंकणी
शब्दांकन- (चैत्राली ओक / वर्षा कुलकर्णी)