वंदना चव्हाण
सामाजात वावरताना सामाजिक बांधिलकीची जाणीव मनामध्ये जपत, कोणीतरी येऊन बदल घडवेल याची वाट न पाहता आपण स्वतःहून काहीतरी करावं या विचारांनी त्या कार्य करत आहेत. लोकांसाठी, लोकहितासाठी लढणाऱ्या, एकाच वेळी विविध विषयांमधील अनेक गोष्टी लीलया पद्धतीने पार पाडणाऱ्या लोकप्रिय संवेदनशील कार्यकर्त्या वंदना चव्हाण.
सायन्स क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असताना, अपघाताने वकिली क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. वडिलांच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश घेतला. BSC आणि LAW असे दोन्हीचे शिक्षण पूर्ण केले. प्रॅक्टिस करत असनाना क्रिमिनल केसेसमध्ये त्यांना विशेष रुची निर्माण झाली. 8 वर्ष प्रॅक्टिस करीत असताना विविध केसेस त्या यशस्वीपणे लढल्या. पुढे अनेक ठिकाणी काम करताना त्यांना वकिली क्षेत्राचा फायदा झाला म्हणूनच वडिलांचा निर्णय माझ्यासाठी योग्य ठरला हे त्या आवर्जून सांगतात.
सन 1992 मध्ये राजकीय क्षेत्रात महिलांसाठी 30% रिझर्व्हेशन आलं आणि पुन्हा एकदा ध्यानीमनी नसताना अपघातानेच राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रवेश झाला. अर्जदारचा फॉर्म भरून द्यायच्या शेवटच्या काही तासांपर्यंत त्यांचा या क्षेत्रात येण्यास नकार होता. राजकारणाला आपण सहज नाव ठेवतो पण तुझ्याकडे ही संधी आली आहे बदल घडविण्याची तर तू हे कर. ही आपली moral responsibility आहे असं समज हे घरच्यांचे शब्द त्यांना भावले आणि त्यांनी अर्जदाराचा फॉर्म भरला. हाच त्यांच्या आयुष्याला मिललेला टर्निंग पॉईंट.
केवळ पहिली 5 चं वर्ष काम करणार या बोलीबर काम सुरू केलं पण व्यक्तीचं काम बोलतं अस म्हणतात तसंच घडलं. सलग 15 वर्ष त्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. या काळात विविध सामाजिक प्रश्न त्यांनी सोडविले. जनसामान्यांच्या हक्कासाठी त्या लढल्या. कामावरची निष्ठा, मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळेच पुणे शहराच्या महापौर होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला.
राजकारणासारख्या किचकट आणि क्लेशदायी वाटणाऱ्या क्षेत्रात वंदना ताई आज अविरत कार्य करीत आहे. परखड व्यक्तिमत्त्व, कामातील पारदर्शकता आणि जनसामान्यांत मिळून मिसळून काम करण्याची तयारी असे अनेक त्यांच्या अंगी असलेले गुण त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेले असं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही. वकिली क्षेत्र असो किंवा राजकारण अनेक आघाड्यांवर काम करताना विविध अडचणींचा, संकटांचा त्यांनी ध्येर्याने सामना केला.राजकीय कारकिर्दीत विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.
महिलांचे विविध प्रश्न, पर्यावरण क्षेत्रातील अनेक महत्ववाचे मुद्दे, लहान मुले/ ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या अशा विविध विषयांवर त्यांनी वेळोवेळी संसदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. ऊसतोडणी कामगार महिलांचा यक्ष असो किंवा अन्य कोणताही योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी वंदना चव्हाण या नेहमीच तत्पर असतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी दोन गावेही दत्तक घेतली आहे. ग्रामीण भागात काम करण्याची त्यांची तशी ही पहिलीच वेळ असल्याने त्यांच्यासमोर हे एक आवाहन होते. सर्वात आधी त्यांनी गावातील लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी सलोख्याचे संबंध स्थापित केले. महिलांसाठी खास सेशनचे आयोजन केले गेले. गावातील महिलांना शेतीविषयकचे पूर्ण शिक्षण दिले. आता त्या महिला उत्तम पीक घेत आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. गावात संगणक लॅब काढली ज्यात 200 हून अधिक महिलांनी कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले आहे. या गावांमधील महिला आता स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत.
कोविड महामारीच्या काळातही वंदना चव्हाण यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्वतः कोविड सेंटरला भेट देऊन तेथील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रत्यन केले. प्रशासनाला वेळोवेळी काही त्रुटी असतील तर त्या लक्षात आणून देत, त्याचा पाठपुरावा करत, त्यांनी या महामारीच्या काळात सक्षम कामगिरी पार पाडली आहे.
वंदना चव्हाण यांच्या कार्याचा हा आलेख असाच दिवसेंदिवस वाढतो आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत, अपयशाने खचून न जाता आणि यशाने हुरळून न जाता त्यांनी स्वतःला विविध पातळ्यांवर सिद्ध करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या या यशात कुटूंबियांचा खूप मोठा वाटा आहे हे त्या आवर्जून सांगतात. गार्डनिंग, पेंटिंग, स्टिचिंग, कुकिंग असे विविध छंद आपल्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढत त्या जपत असतात.
“पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणवादी असणं गरजेचं नसतं कारण पर्यावरण ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. दरवर्षी घरटी कमीत कमी एक झाड तरी लावलंच गेलं पाहिजे. वाढते प्रदूषण रोखलं पाहिजे आणि ते आपल्याचं हातात आहे, त्यामुळे गाड्यांचा वापर कमी करणे, शक्य असेल तिथे सायकल किंवा पायी चालत जायचा मार्ग स्वीकारणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे या जबाबदाऱ्या आपण स्वतःहून स्वीकारणे गरजेचे आहे” हे त्या नेहमी आवर्जून सांगतात.
“मुलगा आणि मुलगी यात कधीही भेदभाव करू नये दोघांनाही समान हक्क, वागणूक मिळालीच पाहिजे. महिलांनी स्वतःला कधीच कमी लेखू नये कारण त्यांच्यामध्ये मल्टी टास्किंग कपॅसिटी असते. जीवनात येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करत तिने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे जे ती करू शकते कारण तिची तेवढी क्षमता आहे.” असं वंदना चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.
बिइंग वुमन पाक्षिक महिलांना उत्तम व्यासपीठ देत आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत आहे आणि त्यांना लढण्याची ताकद देत आहे याचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.