Being Woman

पर्यावरणस्नेही स्वागत गणरायाचे

पर्यावरणस्नेही स्वागत गणरायाचे

पर्यावरणस्नेही स्वागत गणरायाचे! 🪷🪷

   नानाविध धर्म, पंथ, भाषा, चालीरीती आणि परंपरा समाविष्ट असलेल्या आपल्या भारत देशाची ‘विविधतेतील एकता’ ही अखिल जगामध्ये कौतुकास्पद ठरणारी वैशिष्ट्यपूर्ण अशी प्राचीन भारतीय संस्कृती आहे. आपल्या देशात विविध धर्मांमध्ये ऋतुप्रमाणे महिना आणि तिथीनुसार सण व उत्सव साजरे करण्याची फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. सण व उत्सव साजरा करण्याची ही रूढी, परंपरा हे समाजमानसाकरिता हितकारकच ठरत असतात. कारण समाजातील भिन्न धर्मीय, पंथीय, भाषिक लोकं सद्भावनेने एकत्र येऊन मिळून जेव्हा सण व उत्सव साजरा करत असतात तेव्हा निर्व्याजपणे आनंद घेणे आणि देणे ही क्रिया घडत असते. त्यामुळे सर्वत्र आपसूकच आनंदवर्धक व उत्साहवर्धक वातावरण निर्माण होते. उत्सव काळात ओसंडून वाहणारा आनंद व उत्साह हा नागरिकांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी नक्कीच पोषक ठरत असतो. शिवाय उत्सव काळात सर्वांच्या हातून सत्कार्यातून पुण्य घडत असते त्यामुळे समाजात सदाचार वाढीस लागतो.

    भारत देशातील बऱ्याचशा सण व उत्सव साजरा करण्याच्या पद्धती ह्या मूलतः निसर्गपूरकच होत्या. पूर्वीच्या काळी भारतात विपुल प्रमाणात घनदाट जंगले होती आणि लोकसंख्या देखील मर्यादित होती. परंतु सध्याच्या काळात चित्र पालटले असून भारतात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. लोकसंख्येने कधीच उच्चतम पातळीची मर्यादा पार केलेली आहे. तसेच विकासाच्या नावाखाली दिवसेंदिवस जलद वाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे खूप मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण, डोंगरफोड, वृक्षतोड होताना दिसत आहे. जंगल तोडीमुळे वनक्षेत्रावर गदा आलेली असून जागतिक तापमान वाढीची न सुटणारी समस्या ही आता डोकेदुखीच बनली आहे. कालौघात परंपरागत सण साजरा करण्याच्या पद्धतींमध्ये लोकांनी आपल्याला हवे तसे बदल करायला सुरुवात केली आणि निसर्गात अवाजवी हस्तक्षेप करणे सुरु केले. यासंदर्भात सार्वजनिक गणेशोत्सवाचेच उदाहरण घेऊया. प्रचंड प्रमाणात लायटिंग करून वीजेचा अपव्यय करणे, सजावट म्हणून प्लास्टिक व थर्माकोलच्या शोभिवंत वस्तू वापरणे, डिजेच्या तालावर लाऊडस्पीकरवर कर्कश गाणी लावून बेधुंद नृत्य करणे, रासायनिक गुलालाचा मिरवणुकीत अति प्रमाणात वापर करणे, रस्त्यांवर कानठळ्या बसतील इतक्या मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, मोठमोठे प्लास्टिकचे बॅनर्स/होर्डिंग वापरणे, दरवर्षी मोठ्या आकाराच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) किंवा शाडूच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून त्या विसर्जित करणे अशा अविचारी कृत्यांमुळे आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेऊन अनेक तऱ्हेच्या प्रदूषणाचा भस्मासुर मागे लावून घेतला आहे. 

   पीओपी पूर्णतः हानिकारक नसले तरीही पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्यामुळे पाण्यातील क्षार आणि अल्कली यांचे प्रमाण वाढते. तसेच पीओपीच्या मूर्तींचे पूर्णपणे विघटन होण्यास प्रचंड वेळ म्हणजे वर्षानुवर्षे लागतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पीओपीच्या मूर्तींवरील कृत्रिम रंगांमुळे पाणी विषारी होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाडू माती ही पर्यावरणपूरक आहे असा फार मोठा गैरसमज प्रचलित आहे. शाडू माती ही मुळात क्ले म्हणजे चिकणमाती आहे. क्ले असल्यामुळे शाडू माती ही अविघटनशील आहे. त्या मातीचा राब पाणवठ्याच्या तळाशी जाऊन घट्ट बसतो. यामुळे तळात असणाऱ्या नैसर्गिक झऱ्यांवर विपरीत परिणाम होतो. यावर शास्त्रीय संशोधन झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक छोटी-मोठी कृती करण्यापूर्वी त्या कृतीचे पुढे पर्यावरणीय आणि सामाजिक पातळ्यांवर नक्की काय परिणाम होतील असा दूरगामी व सर्वांगीण विचार करून मगच योग्य ठरणारी कृती जाणीवपूर्वक करण्याची वेळ आलेली आहे. असे धोरण ठेवले नाही तर आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळे नकळत पुढच्या पिढीवर आपल्या हातून अन्याय होणार आहे. श्री समर्थांनी त्यांच्या वाङ्मयातून वेळोवेळी सावधानतेचा आणि विवेकशील वर्तणुकीचा इशारा दिलेला आहेच; तो आता अंमलात आणण्याची वेळ आलेली आहे नाहीतर सिंदबादचा म्हातारा विविध प्रकारच्या प्रदूषणाच्या स्वरूपात येऊन आपली पाठ काही सोडायला तयार होणार नाही. 

    क्षणात येई सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे ‘ असा ऊन-पावसाचा लपंडाव खेळत अद्भुत निसर्गरुप धारण करणारा आणि विविध व्रतवैकल्ये घेऊन येणारा हिरवागार श्रावण मास संपून नुकताच भाद्रपद मास सुरू झालाय. श्रावणातील भक्तिमय वातावरण आता या मासात टिपेला पोहोचले आहे. भाद्रपद म्हटलं की घरोघरी होणारे हरितालिका पूजन, श्री गणरायाचे आगमन आणि पाठोपाठ येणाऱ्या ज्येष्ठा गौरी हे सुंदर व प्रसन्न दृश्य सर्वप्रथम नजरेसमोर तरळते. असा हा घराघरात आनंद घेऊन येणारा गणपती उत्सव शक्य तितका पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केल्यास नक्कीच पुण्य पदरी पडून निसर्ग रक्षणात खारीचा वाटा उचलल्याचे मनास समाधान लाभेल. 

    निसर्ग-केंद्रित दृष्टिकोनातून पर्यावरण रक्षण हा हेतू लक्षात घेत सर्वांत आधी गणेश मूर्तीचा विचार केला पाहिजे. पूर्वीच्या काळी नदीकाठची माती गोळा करून त्यापासून गणेश मूर्ती घडवण्याची प्रथा होती. सध्याच्या काळात प्रदूषणामुळे दूषित झालेले नैसर्गिक पाणवठे लक्षात घेता आपल्या घरी दरवर्षी विसर्जनाची चाल असल्यास ) रिसायकलिंग करून कागदाच्या लगद्यापासून तयार केलेला गणपती, ) लाल वा काळ्या मातीचा गणपती, ) गोमय मातीचा गणपती, ) सुपारीचा गणपती अशा पर्यावरणपूरक मूर्ती वापरण्याची गरज भासत आहे. तसेच या मूर्ती रंगवण्याकरिता गेरू, हळद, नैसर्गिक कुंकू असे निसर्गपूरक रंग वापरणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कृत्रिम रासायनिक रंगांमध्ये शिसे, अर्सेनिक, पारा, कॉपर सल्फेट असे विषारी पदार्थ असतात; शिवाय कृत्रिम रंग अविघटनशील असतात. त्यामुळे हे कृत्रिम रासायनिक रंग त्या गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन केल्यावर पाण्यातील जीवसृष्टीस आणि मानवी आरोग्यास घातक ठरतात. मूर्ती न रंगवता तशीसुद्धा पूजेत वापरता येते. कागदाचा लगदा, माती व गोमयापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती ह्या पूर्णतः विघटनशील असल्याने विहीर, ओढा, नदी, समुद्र अशा कुठल्याही नैसर्गिक जलाशयात विसर्जित केल्या तरी त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. अगदी हौद किंवा घरच्या घरी बादलीत जरी ह्या मूर्ती विसर्जित केल्या आणि मूर्ती विरघळल्यावर ते पाणी बागेतील झाडांना किंवा नुसत्या जमिनीत घातले तरी ते पाणी झिरपल्यानंतर झाडे व जमिनीकरिता खत म्हणून हितकारकच ठरते. या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वापर करणे ह्या एका सुयोग्य कृतीतून निसर्गाची सेवा तर घडेलच; शिवाय आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल. अजून एक पर्याय म्हणजे सजावटीसाठी मोठी मूर्ती म्हणून घरातीलच दगडाची वा धातूची कायमस्वरूपी असणारी  मूर्ती वापरावी आणि आकाराने अगदी लहान असणारी पर्यावरणपूरक मूर्ती ही प्राणप्रतिष्ठापना व विसर्जन करण्यासाठी वापरावी. अशाप्रकारे दरवर्षी गणपतीच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याची व विसर्जनाची रूढी असेल आणि ही परंपरा मोडणे उचित वाटत नसेल तर नागरिकांनी सजग होत पर्यावरणपूरक मूर्तीचा योग्य पर्याय शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यामुळे लाडक्या बाप्पाचे यथोचित स्वागत होऊन रितसर गणेशोत्सव साजरा केल्याचे पुण्य तर लाभेलच; शिवाय पर्यावरण रक्षणाची नैतिक जबाबदारी पार पाडल्याचे मानसिक समाधान देखील लाभेल.

फोटो : सजावटीसाठी धातूची कायमस्वरूपी गणेश मूर्ती

      गणेशोत्सवात जी फुले, दुर्वा, पत्री आपण पूजेत वापरतो त्याचे भरपूर निर्माल्य साचत जाते. हे निर्माल्य आपण नदीत अथवा वाहत्या पाण्यात विसर्जित केले, तर त्या निर्माल्यावर प्राणवायू नसलेल्या प्रदूषणयुक्त पाणवठ्यात अवायुजीवी (anaerobic) विघटन प्रक्रिया होते व ते पाण्यात सडत जाऊन त्याची दुर्गंधी येऊ लागते. अशा विघटनात अमोनिया, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड यांसारखे विषारी वायू तयार होतात. हे वायू आपल्या आरोग्यास व पर्यावरणास अत्यंत घातक असतात. यावर उपाय म्हणजे पूजेतील त्या साचलेल्या निर्माल्याचे घरच्या घरी कंपोस्ट तयार करणे. अशी अगदी लहानशी पर्यावरणस्नेही असणारी कृतीसुद्धा पर्यावरण रक्षणास नक्कीच महत्त्वाची ठरते. मग कितीही छोटी का होईना पण पर्यावरणस्नेही कृती अंगिकारून पर्यावरण समतोल राखण्यास व मुख्यत्वे नदी प्रदूषणमुक्त करण्यास हातभार लावूया ना!

      नदीशी एकदा का मनानं जोडलं जाऊन या जीवनदायिनीशी हरवत चाललेलं आपलं नातं पुन्हा प्रस्थापित झालं की कोणतीही गोष्ट करताना तिच्या भल्याचाच विचार आधी मनात येतो आणि मग आपोआप तशी कृती हातून घडत राहते. म्हणून एकदा वेळ काढून आपल्या गावाला वा शहराला पाणी पुरवणाऱ्या जीवनदायिनी नदीला भेट द्यावी आणि तिची अंतर्बाह्य सद्यःस्थिती ‘ याची देही याची डोळा ‘ नीट जाणून घ्यावी. मग मनाने नदीशी जोडलं जाणं सहजपणे घडून येईल. शेवटी ‘ पाणी हेच जीवन ‘ असल्यामुळे नदीच्या भल्यात आपलेपण भले सामावलेले आहे. म्हणून आता ही वेळ सर्वप्रथम ‘ माझी नदी, माझी जबाबदारी! ‘ हा मंत्र आपल्या कृतीतून दृगोच्चर होण्याची आहे. तर मग आता अधिक वेळ न दवडता सजग होत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचाच अशी खूणगाठ मनाशी बांधून गणरायाच्या स्वागतास सज्ज होऊया आणि एक पाऊल विषमुक्त जीवनशैलीच्या दिशेने टाकूया!

सर्व गणेशभक्तांना पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया🪷🪷🪷

लेखिका – प्रिया फुलंब्रीकर
ग्रीन बर्ड्स अभियान, संस्थापक
जीवितनदी, सदस्य व कार्यकर्ता

Share :