शहाणं, गोड, हुशार मुल सर्वांचं असतं, परंतु वेडबागडं-शेंबडं मुल हे फक्त आणि फक्त त्या आईचंच असतं! त्यात जर एखाद्या स्त्रीच्या पोटी शरीरात किंवा मनात व्यंग असलेलं किंवा स्वमग्न किंवा मतिमंद मुल जन्माला आलं तर त्या स्त्रीचं संपुर्ण आयुष्य पणाला लागतं आणि नरक बनते. खरे तर त्यामध्ये तिचा दोष काहीच नसतो परंतु तिचं जगणं दु:सह्य बनतं. अश्या आईचं जगणं सुसह्य होण्यासाठी झटणारी आपली एक सखी आहे जिचं नांव आहे डॉ. प्राजक्ता बोराडे-कोळपकर. त्यांच्या कामाची किंवा आयुष्याची टॅगलाईनच ही आहे की ‘मी दिव्यांग मुलांसाठी नाही तर त्या मुलाच्या आईसाठी हे काम करते!’ यामध्ये एका आनंदी-उत्साही व्यक्तिने, खूप निर्मळ मनाने, केलेला दिव्यांगांचा स्विकार आहे व ती परिस्थिती बदलण्याची धडपड आहे!
डॉ प्राजक्ता या मुळच्या चंद्रपुरच्या. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपुरमध्ये झाले. बीए आणि एम्एसडब्ल्यु तिथे करुन जर्नॅलिझम करण्यासाठी प्राजक्ता नागपुरला आल्या. जर्नॅलिझम केल्यानंतर प्राजक्ताने ‘फाइन आर्ट इन ड्रामा’ चे शिक्षण घेतले. हे सगळं सुरु असतांनाच त्या आकाशवाणी आणि दुरदर्शनवर निवेदिका म्हणुनही काम करत असत. नागपुरमध्ये त्या सर्व ॲक्टिव्हीटी करत होत्याच परंतु त्यांना नाट्यक्षेत्रात काही करण्यासाठी पुण्याला यावयाचे होते. आईवडीलांनी नाराजीने दिलेली संमती घेऊन त्या पुण्यात आल्या. इथे त्यांचे कोणीच नव्हते परंतु अंगभुत गुणांची शिदोरी सोबत होती. त्याच्या जोरावर त्यांनी नाट्यक्षेत्रात काम करायला व कॉपीरायटरची नोकरी करायला सुरुवात केली. पुढे त्यांची मुलगी गार्गी हिचा जन्म झाला व त्यांनी तिच्यासाठी ‘गार्गीज् फन वर्ल्ड’ नावाचे ‘डे केअर सेंटर’ सुरु केले. शहरातील मुलांना मोकळे बालपण मिळावे हा त्यामागील उद्देश होता. ते उत्तम चालत असतांनाच त्यांनी त्यामध्ये दिव्यांग मुलांनाही प्रवेश देणे सुरु केले. अशा मुलांसाठी अठरा वर्षे वयापर्यंत शाळा असते परंतु त्यानंतर या मुलांचे काय ? असा एक प्रश्न त्यांना एका पालकांनी विचारला. ‘आप भी उसकी मां हो! आप कहो तो मैं इसे कचरे के डिब्बे में फेंक दुं!’ असा एका आईचा आर्त प्रश्न त्यांना हेलावुन गेला व आज त्यांच्या संस्थेत अठरा ते साठ या वयोगटाची मुले आहेत. पुढे त्यांनी ‘पिनॅकल रिक्रिएशन’ या संस्थेची स्थापना केली व त्या माध्यमातुन आपल्या कार्याचा विस्तार केला. नंतर याच संस्थेचे रुपांतर ‘पिआरए- प्रा फाऊंडेशन’ मध्ये झाले व आज त्या माध्यमातुन हे दिव्यांग मुलांचे सेंटर काम करते. पुढे याच विषयामध्ये प्राजक्तांनी डॉक्टरेटही केली.
स्वभावत:च धीट असलेल्या प्राजक्तांचे हे सेंटर म्हणजे पॅशन आहे व अतिशय जबाबदारीने त्या हे सेंटर चालवतात. मोठ्या मुलांना घरुन उचलुन सेंटरवर आणणे पालकांना शक्य होत नाही म्हणुन या मुलांना सेंटरवर आणण्यासाठीच्या वाहतुकीची व्यवस्थाही सेंटर करते. एक जर साठ वयाचा मुलगा अाहे तर एेंशी/पंच्याऐंशी वयाची त्याची आई त्याला सेंटरवर कसे आणुन सोडणार हा विचार करुन मुलांच्या पिक्अप ड्रॉपची सोय केली गेली आहे. परंतु जर ड्रायव्हर आले नाहीत तर त्या स्वत: गाडी चालवत मुलांना आणायला जातात. ‘माझी ही शाळा नाही, डे केअर पण नाही तर हे सेंटर आहे. इथे या मुलांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ९ पर्यंत कधीही यांवं. इथे आल्यावर आपल्या आवडीची कोणतीही अॅक्टिव्हीटी करावी. आम्ही इथे नाच-गाणी, खाऊ खाणं, चित्रं काढणं-रंगवणं, आपली रोजची कामं स्वत:ची स्वत: करायला शिकवणं अश्या गोष्टि या मुलांकडुन करुन घेतो. डॉ.प्राजक्तांनी मुलांसाठीच्या थेरपीज स्वत: डिझाईन केल्या आहेत. यामध्ये ‘म्युझिक थेरपी’ व ‘वाॅटर थेरपीज’ आहेत. प्राजक्ता स्वत: मुलांना घेऊन स्विमिंग टॅंकवर जातात व पाण्यात उतरुन त्यांच्याकडुन व्यायाम करुन घेतात. परंतु अमुक एक केलच पाहीजे असा हट्टाग्रह धरत नाहीत. ‘मुलाने स्वत:च्या हाताने खाल्लं नाही तर मावशी लोकं किंवा मी स्वत:, आम्ही त्यांना खाऊ घातलच पाहीजे व त्यांने स्वत: जर शी धुतली नाही तर आम्ही ती धुतलीच पाहिजे असा इथला अलिखीत नियम आहे’ असं त्या सांगतात. त्यादृष्टिने पाहीलं तर हे मुलांचे सेकंड होमच आहे! लॉकडाऊनच्या काळात मुलांना आणणे व पोहोचवणे अवघड होऊ लागले म्हणुन त्यांच्या रहाण्याची सोयही केली गेली आहे. इथे एक तास/दोन तास, एकदिवस/दोन दिवस असे कितीही काळासाठी मुलांना ठेवता येते. असे मुल झाल्यापासुन अडकलेल्या आईला जगण्यासाठी थोडा मोकळा श्वास घेता यावा हा या मागचा उद्देश्य आहे. ‘मी एवढी अॅक्टिव्ह, अनेक गोष्टि करणारी! माझं ते दिव्यांग मुल जर आज असतं तर मी काहीच करु शकले नसते म्हणुन मी अश्या आयांचा विचार प्राधान्याने करते’ असं डॉ. प्राजक्ता आवर्जुन सांगतात.
सेंटरची एवढी जबाबदारी अंगावर असतांना डॉ प्राजक्तांचे समाजातील इतर गोंष्टिंवरही लक्ष असते. कोल्हापुर सांगलीच्या मागील वर्षीच्या पुराच्या संकटात त्या मदत घेऊन कोल्हापुर व सांगलीकरांच्या मदतीला स्वत: धावल्या. तिथे जमेल ती सुविधा त्यांनी त्या लोकांना पुरवली. समाजातुन अनेक प्रकारे मदत मिळवुन ती मदत त्यांनी पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविली. पुण्यामधेही लॉकडाऊनच्या काळात वेश्यावस्तीत जाऊन व्यवसाय बंद पडलेल्या उपाशीतापाशी बायकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला. सर्वसामान्य लोक ज्या गोष्टि करण्याची एरवी कल्पनाही करु शकत नाहीत अशी अनेक दिव्ये या समाजकारणाच्या प्रवासात डॉ. प्राजक्ता सहज करत असतात.
मुलगी गार्गी ही प्राजक्तांची मोठी प्रेरणा आहे. लहानपणापासुनच्या तिच्या सहकार्यामुळे व सपोर्टमुळेच त्या हे काम करु शकतात. त्यांच्या पतीनेही त्यांना हे काम करण्याची मुभा दिली आहे. मॅडमच्या कोणत्याही नवीन धाडसाला पतीने ‘हे करु नकोस असे म्हटले नाही’, म्हणुनच त्या स्वातंत्र्याचा उपयोग करुन ‘त्यांना’ अभिमान वाटेल असं काम उभं करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
आर्थिक गणित नीट नसतांना अशी संस्था चालवणं हे तर अजुनच कठीण कर्म आहे. त्यामुळे सद्ध्या सेंटरवर आनंद व फंडस् यांचं व्यस्त प्रमाण आहे. कारण कित्येक पालक असे आहेत की मुलांना अश्या संस्थेत पाठवण्याची गरज आहे हेच त्यांना पटत नाही. पाठवलं तरी फीज देण्याची मानसिकता नसते किंवा ते देण्याची क्षमता नसते. परंतु फी अभावी मुल या सुविधेपासुन व आनंदापासुन वंचित रहावं हे प्राजक्तांना पटत नाही व त्या कोणत्याही अडवणुकीशिवाय मुलांना दाखल करुन घेतात. आज या सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीवर्गाचा पगार, रोजचा खाण्यापिण्याचा खर्च, जागेचे भाडे अश्या अनेक आघाड्यावर लढा देत डॉ. प्राजक्तांचे हे काम सुरु आहे. समाजाने शक्य होईल तितकी मदत करावी असं कळकळीचं आवाहन त्या करतात. अगदी छोट्या बालमुठीतल्या मदतीपासुन कोणतीही व कसलीही मदत संस्था स्विकारेल तेव्हा लोकांनी जरुर मदत करावी असं समाजाला सांगणं आहे!
या सर्वांबरोबरचं या वयोगटातील मुलांच्या ‘सेक्शुअल बिहेव्हिअर’ चा नाजुक प्रश्नही त्यांना हाताळावां लागतो. डॉ. प्राजक्तांनी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं काऊंसिलींग सुरु केलं आहे. मुलामुलींना जर को-एड मध्ये शिकवलं किंवा एकत्र वावरायला दिलं तर त्यांच्या लैंगिक भावनांचं डिस्ट्रॅक्शन होतं. त्यांच्यातलं सहजीवन निरोगी बनतं व तो क्षण अलगद निघुन जातो. यापुढे जाऊन जर ते मुल अतिरेक करु लागलं तर मात्र त्याला अडवायला हवं. पण अशा मुलामुलींची लग्न लावु देणं हा अत्यंत घातक व चुकीचा उपाय आहे असं डॉ. प्राजक्तांना वाटतं. अश्या मुलींच्या पाळीच्या प्रश्नावरही त्या पालकांचे समुपदेशन करतात.
डॉ. प्राजक्तांचे पुढील संकल्पही थोर आहेत. त्या अमेरीकेत गेल्या असतांना तेथील ‘अॅबिलीटी 360’ हे सेंटर जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा हेच आपलं स्वप्न आहे व अशाप्रकारचे सेंटर आपल्याही देशांत उभे करावे असा त्यांचा विचार आहे. त्याद्वारे या दिव्यांग मुलांनी आपल्या कलेद्वारे व स्वकष्टाने, आपल्या मातीचा सुगंध व आपल्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या वस्तु बनवुन त्याची विक्री करावी व आत्मनिर्भर व्हावे जेणेकरुन या मुलांच्या आयांना ‘मी स्पेशल मॉम’ असा खराखुरा अभिमान वाटेल. पण अशा प्रकारचे सेंटर पुढे जाऊन बंद पडावे, याची गरजच पडु नये, म्हणजेच आपल्या देशांत प्रत्येक आईच्या पोटी सुदृढ बालकच जन्माला यावे असेही त्यांना वाटते.
डॉ प्राजक्तांचे सर्व संकल्प पुर्ण व्हावेत, सर्व स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्यासाठी नियतीने त्यांना बळ द्यावे ही ‘बिइंगवुमन’ परिवारातर्फे त्यांना मनापासुन शुभेच्छा! मी डॉ. प्राजक्तांसाठी असं म्हणेन की, ‘हे एक झाकलं माणिक आहे आणि समाजाने आतातरी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावरचा भार हलका करण्यासाठी त्यांना मदत करायला हवी!’
संजीवनी दीपक घळसासी,
सी११०१, महेश गॅलेक्सी,
सिंहगड कॉलेज रोड, वडगांव,
पुणे-४११०४१.
९२८४०२८०७६