Being Woman

गझल

‘गझलियत भाग ७ ‘

सुरेश भट!  मराठी कवितेला पडलेलं एक सुंदर स्वप्न….14 मार्च 2003ला हे स्वप्न भंगलं!!!

मराठी गझलसम्राट म्हणून सुरेश भट ओळखले जातात. मराठी भाषेमध्ये माधव ज्युलियन यांनी गझलेसाठी बरेच कष्ट घेतले.  पण मराठी रसिकांना मात्र सुरेश भटांनी आपल्या गझलेततिचे खरे विशुद्ध रूप कसे काय असते हे समजावून सांगितले.  सुरेश भटांचे आगमन गझलेच्या प्रांगणात होतात मराठी गजल झळाळून उठली.

चल उठ रे मुकुंदा,  आज गोकुळात रंग खेळतो हरी…भक्तिभावात तल्लीन होऊन अशा कविता लिहिणारे सुरेश भट मलमली तारुण्य माझे,  मालवून टाक दीप अशा शृंगारिक कविता तितक्याच तरलपणे लिहीत.  समाजातील मूल्यहीनता पाहून त्यांच्या लेखणीला धार चढते आणि उषःकाल होता होता काळरात्र झाली अशा शब्दातपरखड वास्तव ते व्यक्त करतात.

आपली जीवनानुभूती, मराठी भाषा आणि गझल या गोष्टींशी त्यांनी आयुष्यभर इमान राखले.

समकालीनांकडून मिळालेली उपेक्षापूर्ण तुच्छ वागणूक,  नातेवाईकांची परिस्थितीनुसार बदललेली वागणूक, त्यांनी  केलेले अपमान हे सारं पचवून सुरेश भट लिहीत राहिले.

चोख, तंत्रशुद्ध आणि बावनकशी मराठी गझल त्यांनी मराठी भाषेच्या रांगड्या मातीत रुजवली. नाजुक अशा गझलची पैदास केली तसेच परखड सामाजिक आशयाचे शेरही लिहिले.

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते अशा शब्दात ते आपली वेदना मांडतात.

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते

कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते

हा शेर तर प्रत्येकालाच पटणारा.

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली

मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा

गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली

अशा शेरांनी भूतकाळाची एक हळवी जखम ते उलगडतात.

मी कशाला जन्मलो? चुकलेच माझे!

ह्या जगाशी भांडलो!  चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते

एकटा मी हसलो – चुकलेच माझे

वाट माझ्या चार शब्दांचीच होती

मी न काही बोललो! –  चुकलेच माझे!

.हे किंवा

सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके

थांबणेही अघोरी कला यार हो

अशा सामाजिक आशयाचे शेरही त्यांनी गझलेत आणले.

लोक रस्त्यावरी यावया लागले

दूर नाही अता फैसला यार हो

गझलचा आकृतीबंध आणिशेर हे गझलचे प्राणतत्त्व सुरेश भटांनी अचूक ओळखलं आणि मराठी गझलच्या शेराचे  शिल्प त्यांनी घडवलं.  तंत्रशुद्ध गझल आणि तिचे आशयसौंदर्य आपल्या गझलेतून उभं केलं. त्यांचा मोठेपणा असा की शिष्यांची एक फळी त्यांनी महाराष्ट्रभर फिरून तयार केली, घडवली. गझल हेच त्यांचं ध्यासपर्व होतं.

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

हा त्यामागे विचार होता.

कशास व्यासपीठ पाहिजे तुला

घराघरात गीत गुणगुणून जा

कशास पाहिजे तुला परंपरा

तुझीच परंपरा बनून जा!!! असा संदेश ते देतात.

त्यांच्या कार्याला मराठी रसिक कधीच विसरू शकत नाहीत. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!!

स्वाती यादव.

9673998600

swash6870@gmail.com

Share :