Being Woman

गझल

‘ गझल ‘

काळजाची भाषा म्हणजे गझल. सर्व साहित्य प्रकारांमध्ये कवितेला सर्वश्रेष्ठ मानलं जातं याचं कारण अतिशय कमी शब्दांमध्ये प्रचंड मोठा आशय सांगण्याची तिची क्षमता!!! गझलला कवितेची कविता असं म्हटलं जातं. गझल खूप दूरवरून प्रवास करत आपल्याकडे पोचली आहे. गझल हा खरंतर अरबी शब्द असून गंमत अशी की गझल त्या भाषेत विकसित झाली नाही.
अरब लोक वाळवंटात टोळ्या (कबिला) करून राहत. नेत्यावर टोळीतील सदस्यांचा परम विश्वास असे. त्यांची काव्यात्मक स्तुती म्हणून कसीदा हा काव्यप्रकार रूढ झाला. त्याच्या सुरुवातीला काही ओळींचा उपयोग कवी स्वतःचे विचार मांडण्यासाठी करत. त्यात बहुदा प्रणयरस ओथंबलेला असे. या भागाला तश्बीब असं म्हणत. पुढे अरबांनी पर्शिया काबीज केला म्हणजेच सध्याचा इराण! इराणी कवी सौंदर्यउपासक असल्यामुळेच त्यांना कसिदयापेक्षा तश्बीब जास्त आवडली. रुदकी या कवीने तश्बीब वेगळी काढली आणि प्रेमकविता तयार झाली तीच गझल!!!
सर्वप्रथम ही रचना पर्शियन भाषेमध्ये झाली. उर्दू यावेळी अस्तित्वातही नव्हती. अमीर खुसरो यांच्या मते धर्मप्रचारासोबत पर्शियन गझल गजनि मुलतान व लाहोर मार्गे दिल्लीत आली. अमीर खुसरो यांना हिंदी काव्याचा जनक, उर्दू अदब आणि शायरीचा जनक असं मानलं जातं कारण त्यांनी अपभ्रंश भाषेत पर्शियन व तुर्की शब्दांचा भरणा करून हिंदी म्हणजेच हिंदवी भाषा निर्माण केली. त्यांनी सुमारे 540 गझला लिहिल्या आहेत. अमीर खुसरो नंतर 400 वर्षांनंतर हिंदवी भाषेला अरबी व फार्सी भाषेचा मुलामा देऊन रेख्ता म्हणजेच उर्दू ही भाषा वली दकनी यांनी तयार केली. ते औरंगाबादचे होते.
गझल या शब्दाचा मूळ अर्थ स्त्री व लक्षणेने स्त्रीविषयक प्रेम असाच होतो.
गझल हा काव्यप्रकार पुरुषाची स्त्रीविषयक प्रेमभावना या केंद्राशीच गुंतलेला होता. मराठी गझल म्हटलं की अमृतराय यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येतच नाही. मोरोपंत माधवराव पटवर्धन, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर यांनीही गझल लिहिली पण गझल ही विधा खऱ्या अर्थाने आणि तंत्रशुद्ध स्वरूपात सुरेश भटांनी रुजवली. आता भटांनंतरची चौथी पिढी गझल लिहीत आहे. मराठी गझल खऱ्या अर्थाने रुजली असून तिच्यात प्रेमाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे सामाजिक विषयही हाताळले जात आहेत.
गझल आपल्याला अधिक चांगला माणूस बनवते, क्षमाशील बनवते. ज्याच्याकडे मनाचं सौंदर्य असतं, परखडपणा असतो पण तो दुसऱ्याच्या भल्यासाठी वापरला जातो त्यांनाच गझल प्रसन्न होते. ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण म्हणतात, “जगण्यात असलियत असली की गजलेत गजलियत आपोआप येते.”
दोन ओळींच्या शेरांमध्ये एक संपूर्ण कथानक उभे करणारी गझल!!! समजून घेऊया तिचं विस्तृत स्वरूप पुढच्या भागात.

स्वाती यादव
9673998600
30-11-2020.

Share :