भारतीय कला शैलीतील एक अभिजात अशी नृत्य कला. कला ही माणसाला जगायला शिकवते. कला माणसाला घडवते. कला ही कलाकारासाठी फक्त उपजीविकेचे साधन नसते, तर ती त्याचा श्वास बनते. आपलं संपूर्ण आयुष्य नृत्य कलेला समर्पित केलेल्या, ज्यांच्या आचारात-विचारात कला वास करते, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता वास करते अशा पंडिता गुरू ‘मनीषा साठे’.
मनीषा साठे यांचा जन्म झाला त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना डेड चाईल्ड म्हणून घोषित केलं. पण नियतीला ते मान्य नव्हतं कारण भविष्यात नृत्य कलेचा प्रवास मनिषाताईंची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होता. नगरमधील एका डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना थेरपी सुरू करण्यात आली आणि कोमेजलेल्या त्या कोवळ्या जीवाला उमलण्यासाठी प्रकाशाची नवी वाट सापडली. लहान असताना रेडिओवर एखादे गाणे लागले की त्यांची पावले न कळतपणे ताल धरायची. हे पाहून त्यांच्या आईवडिलांनी ठवरविले की मुलीला नृत्याचे शिक्षण द्यायचे आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय मनिषाताईंच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
मुंबईला त्यांचे गुरू पंडित ‘गोपी कृष्णजी’ यांच्याकडे त्यांच्या नृत्याला सुंदर पैलू पडू लागले. अत्यंत कठोर असे नृत्याचे शिक्षण त्यांनी घेतले आणि हळूहळू नृत्य हेच आपल्या जगण्याचे साधन आहे माध्यम आहे हे जाणून यातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दरम्यानच्या काळात राजस साठे यांच्याशी त्यांची लग्नगाठ बांधली गेली आणि संसाराचा एक नवा प्रवास सुरु झाला. त्या इथेही थांबल्या नाहीत, उलट त्यांना त्यांच्या पतीची यात उत्तम साथ लाभली. सकाळी लवकर उठून वेळेत कामे आटपून त्या रिआज करीत असत. नृत्याविषयी विविध पुस्तकांचे वाचन करीत. त्यावेळी आपण कथक नृत्याचे क्लास सुरू करावेत असा कोणताही विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. त्यांच्याच नात्यातील आणि ओळखीत 4 ते 5 जणी त्यांचाकडे कथक नृत्याचे शिक्षण घ्यायला येऊ लागल्या आणि इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्यांच्या नृत्यकला विस्ताराला असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.
1975 साली त्यांनी ‘मनीषा नृत्यालाया’ची स्थापना केली. आजपर्यंत अनेक शिष्या त्यांनी घडविल्या आहेत. जगभरात त्यांचा शिष्य परिवार पसरला आहे. त्यांच्या नृत्यालयाचे खास वैशिष्ट्य असे म्हणता येईल की 8 वर्षांपासून पुढे ते अगदी 60 ते 70 वय असणाऱ्या महिला देखील त्यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेत आहेत.
केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही त्यांच्या अनेक शिष्यांनी मनीषाताईंच्या मार्गदर्शनाखाली नृत्य वर्ग सुरू केले आहेत. आजवर नृत्याचे अनेक प्रोग्रॅम त्यांनी सादर केले आहेत. सवाई गंधर्व, भीमसेन संगीत मोहत्सव, खजुराहो नृत्य मोहोत्सव अशा अनेक कार्यक्रमात त्यांनी त्यांची कला सादर केली आहे. प्रसन्न मुद्रा, तालाची पकड, भावपूर्ण अविष्कार आणि मनमोहक सादरीकरण या त्यांच्या नृत्यशैलीमुळेच भारतात असो किंवा परदेशात त्यांच्या कार्यक्रमांना हाऊसफुलचा फलक असतोच असतो. सामाजिक बंधीलकीची जपणूक करत अनेक प्रोग्रॅमस् त्यांनी गरजूंच्या फंड रेझिंगसाठी देखील केले आहेत, करीत आहेत.
महाराष्ट्र स्टेट कल्चरल अवॉर्ड, गोळवलकर गुरुजी पुरस्कार, पलुस्कर गुरू-गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला गेला आहे. पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रात आणि भारती विद्यापीठात त्या ‘मानद गुरू’ कार्यरत आहेत तसेच पी.एच.डी. साठी त्या मार्गदर्शक देखील आहेत.
स्त्रियांमध्ये एक आंतरिक ऊर्जा सामावलेली असते आणि त्याचा योग्य उपयोग प्रत्येक स्त्रीने तिच्या उन्नतीसाठी करून घेणे गरजेचे आहे असं त्या आवर्जून सांगतात. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता धैर्याने त्याचा सामना करायला हवा. मनिषताई यांना दिवस असताना देखील 9व्या महिन्यापर्यंत त्या क्लासेस घेत होत्या. तिसरा महिना असताना त्यांनी स्टेजवर परफॉर्मन्सही दिला होता आणि म्हणूनच स्त्रीने स्वतःला कधीच कमकुवत समजू नये असही त्या म्हणतात. सुखासाठी फार काही करायची गरज नसते. तुम्ही फक्त प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला पाहिजे. घर – व्यवसाय/ नोकरी दोन्ही सांभाळत असताना त्याचा योग्य समतोल राखता आला पाहिजे. घरचा उंबरा ओलांडताना तुमचा व्यवसाय, नोकरी हे सगळे विचार बाहेरच ठेवून आत प्रवेश करायचा. मी किती दमले आहे, मी किती करते मग आता माझी विचारपूस कोणीतरी करावी या अपेक्षा आपण ठेवता कामा नये. घर आणि नोकरी यामध्ये पार्टीशिअन टाकता आलेच पाहिजे. घडविणाऱ्या आपणच असतो त्यामुळे त्याचा योग्य सांभाळ करणे ही देखील आपलीच जबाबदारी असते.
मुळात आधी स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे म्हणजे मग आपल्याला सगळीकडे आनंद शोधता येतो आणि इतरांना देता येतो असही त्या आवर्जून सांगतात. आपल्या या संपूर्ण प्रवासात कुटुंबियांची मोलाची साथ लाभली हे त्या नेहमी सांगत असतात.
जिद्द, चिकाटी आणि ध्येय या गोष्टी अंगी बाणल्या की त्याला वयाची आडकाठी येत नाही हे मनीषाताईंकडे बघून लक्षात येते. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी कुठलाही विशेष सत्कार समारंभ किंवा सोहळा न करता 61 नृत्याचे कार्यक्रम करण्याचा मानस केला आणि 61 व्या वर्षी ही कार्यक्रमांची शृंखला त्यांनी संपूर्ण केली. पंडिता गुरू मनिषा साठे यांचा संपूर्ण प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे यात तिळमात्र शंका नाही.
बिइंग वुमन पाक्षिक आज अनेक स्त्रीयांना त्यांच्या विविध लेखांच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचे काम करीत आहे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे याचे मनीषा साठे यांनी विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.