Being Woman

आकाशदर्शन

‘आकाशदर्शन ‘

अरुंधती केश किंवा  कोमा बेरेनिसिस

     भूतपा जवळ असलेल्या कोमा बेरेनिसिस म्हणजे अरुंधती केश या तारकासमूहा बद्दल माहिती जाणून घेऊया.   स्वाती आणि चित्रा या दोन ताऱ्यांना जोडणारी रेषा पाया धरून भूतपाच्या विरूध्द बाजूला एका काटकोन त्रिकोणाची कल्पना केली तर त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या कोनापाशी एक अंधुकसा तारकासमुह आहे,  तो म्हणजे ‘अरुंधती केश’ त्याचे पाश्चात्य नाव ‘ कोमा बेरेनिसिस ‘ .  प्राचिनकाळी हा तारकासमूह स्वतंत्र समजला जात नव्हता तर त्याचा समावेश सिंह राशीच्या तारकासमूहात केला जाई. त्या वेळी सिंहाची शेपटी  उभारलेली दाखवून त्यात या अरुंधती केश चा समावेश होत होता.  इ. स. १६०2 मध्ये टायको ब्राहे याने ‘कोमा बेरेनिसिस’ हे नाव रूढ करायला सुरुवात केली. त्यानंतर सिंहाची शेपटी उभी दाखवणे बंद झाले.  ती शेपटी वळवून डेनेबोला हा तारा सिंह राशीतील बीटा तारा म्हणून गणला जाऊ लागला. 

    ” बेरिनिस ” ही इजिप्तचा राजा तिसरा ‘ टॉलेमी ‘ याची रूपसुंदर राणी. तिच्या सौंदर्याचे मुख्य कारण म्हणजे तिचे रेशमी सुंदर केस.  टॉलेमी हा इ. स. पूर्व ३ ऱ्या शतकात इजिप्तचा फारोह होता. टॉलेमी एकदा सीरियाच्या स्वारीवर निघाला होता.  ती मोहिम तशी अवघड आणि जिवावर बेतू शकेल अशी  होती.  राणीने काळजीत पडून व्हीनस च्या देवळात जाऊन प्रार्थना केली आणि नवस केला  की माझा पती सुखरूप परत आला तर मी माझे सुंदर केस तुला अर्पण करीन.  राजा सुखरूप परत आला आणि  मग बोलल्या प्रमाणे राणीने  आपले केस देवाला अर्पण केले.  ते देवळात टांगून ठेवले होते.  देवळात ठेवलेले केस दुसऱ्या दिवशी देवळातून गायब झाले.  ते केस चोरीला गेले. त्यात बहुतेक देवळाच्या पुजाऱ्याचा हात असावा.  त्याला वाचवण्यासाठी म्हणून राजज्योतिषाने राजाला पटवले की राणीने अर्पण केलेली भेट देवीला एवढी आवडली की देवीने  ती आपल्या बरोबर स्वर्गात नेली अशा रितीने राणीच्या केसांना आकाशात स्थान मिळाले ‘ कोमा बेरेनिसिस ‘  म्हणजेच ते बेरेनिस राणीचे केस. राणी नाही तर नाही तिचे नुसते केसच बघून घ्या. 

            आपल्या कडील अरुंधती केश हे नाव कसे पडले याचा काही उल्लेख कुठे आढळत नाही.  असे म्हणतात की आपल्या आकाशगंगेचा शिरोबिंदू म्हणजे ‘गांगेय ध्रुव ‘ या अरुंधती केश तारकासमूहात आहे. 

– लीना दामले

Share :