Being Woman

आकाशदर्शन

‘अवकाशातील दिवाळी’

आपण पृथ्वीवर तेही भारतात वर्षातून एकदाच दिवाळी साजरी करतो. त्याच वेळी फटाके उडवतो, आतषबाजी करतो.  पण अवकाशात मात्र  कुठे ना कुठे सतत आतषबाजी चालूच असते. 

ताऱ्यांचे एक जीवन चक्र असते, त्यांचा जन्म होतो, ते तरुण होतात, म्हातारे होतात आणि कालांतराने मराठी.   ताऱ्यांना  त्यांचे मर्यादित आयुष्य असते, अर्थात त्यांची मर्यादा  आपल्या दृष्टीने अमर्याद आहे ते सोडून द्या. त्यामुळे एखादा तारा जेव्हा मरणपंथाला लागतो, त्याच्या आयुष्याच्या शेवटाला पोहोचतो तेव्हा  सुपरनोव्हा च्या स्वरूपात महास्फोटाच्या रुपात तो संपतो.  त्या दरम्यान अवकाशात जी आतषबाजी होते ती प्रत्यक्षात जरी बघायला नाही मिळाली तरी त्या स्फोटा नंतर उरलेल्या अवशेषांचे दर्शनही विलोभनीय असते.  अशा वायुरूपात उरलेल्या अवशेषांच्या  ढगालाही नेब्युला म्हणतात. अशा प्रकारच्या नेब्युलाचे उदाहरण म्हणजे क्रॅब नेब्युला . 1840 मध्ये विलियम पारसन्स नावाच्या खगोल निरीक्षकाने दुर्बिणीतून बघितले तेव्हा तो एखाद्या क्रॅब म्हणजे खेकड्या सारखा दिसला, म्हणून त्याला क्रॅब नेब्युला हे नाव पडले. मात्र त्याच सुपरनोव्हा चा स्फोट 1054 मध्ये चिनी खगोल निरीक्षकांनी बघितला होता आणि त्याची नोंदही त्यांनी करून ठेवली आहे.

अवकाशात अनेक वेळा दोन कृष्णविवरे किंवा दोन न्यूट्रॉन तारे एकमेकांवर आदळतात त्या वेळी जी आतषबाजी होत असेल ती आपल्याला बघायला  मिळत नाही. अर्थात ते बघायला मिळत नाही हे एक प्रकारे ठीकच आहे. बघता येईल अशा अंतरावर जर ही आतषबाजी झाली तर आपली पृथ्वीच जळून खाक होईल. पण ती घटना gravity waves च्या रूपाने आपल्याला समजते हेही नसे थोडके.

मोठ्या मोठ्या दीर्घिकांच्या रूपाने आपल्याला अवकाशात भुईचक्र बघितल्याचे समाधान मिळते. अगदी नैसर्गिक भुईचक्र, फक्त ते भुईवर नाही तर दूर दूर अवकाशात 

आकाशात दुरून शांतपणे चमचमणारे तारे दिसतात त्यावर जाऊ नका. प्रत्येक तारा हा स्वतःच एखाद्या अणुभट्टी सारखा खदखदत असतो, (आपला सूर्यही त्यातच आला) क्षणाक्षणाला त्यातून उद्रेक होत असतात आणि त्यातून प्रकाश व ऊर्जा बाहेर फेकली जात असते. लाखो कि.मी. उंच ज्वाळा उठत असतात. ही आतषबाजीही दुरूनच बघितलेली बरी नाही का? कारण त्याच्या पासून लाखो कि. मी. दूर असलो तरी  त्यातून निघणाऱ्या radiations चा आपल्यावर परिणाम होऊ शकतो.

सगळ्यात उत्तम आणि आपल्याला पृथ्वीवरून बघता येईल अशी आकाशातली आतषबाजी म्हणजे उल्कावर्षाव म्हणजेच meteor shower. जणू आकाशात उडणारे फटाक्यातले बाणच. फक्त हे बाण जमिनीवरून आकाशात न जाता आकाशातून जमिनीवर येतात.  प्रत्येक महिन्यात एखाद्या विशिष्ट तारकासमूहातून काही ठराविक दिवशी उल्कावर्षाव बघायला मिळतो. एरवीही आपल्याला एखाददुसरी उल्का पडताना दिसते पण या विशिष्ट दिवशी विशिष्ट तारकासमूहातून  उल्का वर्षावच  झालेला बघायला मिळतो.  मात्र ही नैसर्गिक आतषबाजी तुमचे नशीब जोरावर असेल तरच बघायला मिळते , नाहीतर रात्र रात्र जागूनही काही बघायला मिळत नाही.  पण मुळात हा उल्का वर्षाव का होतो ते माहिती आहे का? 

आपल्या सूर्यमालेत जे अनेक धूमकेतू आहेत ते सूर्याभोवती फेरी मारून परत जाताना त्यांच्या कक्षेत मागे debries सोडून जातात. Debries म्हणजे धूलिकण. त्या धुळीकणांच्या मधून आपली पृथ्वी गेली की ते कण पृथ्वीच्या वातावरणात शिरताना आपल्याला उल्कापात झालेला दिसतो. 

या आतषबाजीच्या जोडीला आपल्या आकाशातला आपला चंद्राचा आकाशकंदील तर आहेच नेहेमी साठी. तेव्हा या दिवाळीला अंधाऱ्या रात्री मोकळ्या माळरानावर जाऊन ही आकाशातली आतषबाजी बघायचा जरूर प्रयत्न करा.    

असंख्य असती  तारका
अवकाशीच्या जणू  दीपिका
तरकांच्या त्या  मालिका
बनवती रुपेरी दीर्घिका
कुट्ट काळ्या अवकाशातील
मस्त रुपेरी आकाशकंदील
लवंगी अन चमन चिडया
कोण पुसतो यांना गड्या
इथे  उडतो जो फटाका
सुपरनोव्हाचा हो धमाका 
कोण साजरी करे दिवाळी     
अशा अधांतरी अंतराळ
याच उत्तराचा शोध करी
युगानुयुगे हा देहधारी       

– लीना दामले (खगोलिना)

Share :