मंगळागौर
बिइंग वुमन आयोजित खास श्रावणमास निमित्त
“खेळू खेळ मंगळागौरीचे”
बिइंग वुमनने बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या शो चे आयोजन केले होते. त्यावेळी चित्रपट सुरू होण्यापूर्वी मंगळागौरी खेळ खेळले गेले. सगळ्याजणी उत्साहात खेळत होत्या. अनेकींना हे नवीन होते. पण वेळ कमी पडला आणि त्यावेळी बिइंग वुमनकडे अनेक जणींनी मागणी केली की मंगळागौरीच्या खेळांचा इव्हेंट घ्या. आणि म्हणून ह्या इव्हेन्टचे आयोजन केले गेले.
दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 ते 9 ना.सी.फडके सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला. जवळपास 80 हुन अधिक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. हॉल मध्ये येताना पारंपरिक पद्धतीने सर्व सहभागी महिलांचे स्वागत करण्यात आले. मंगळागौरीचे खेळ मनसोक्त खेळले गेले. यात उखाणे स्पर्धा आणि सर्वोत्तम वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर मंगळागौरीचा पारंपरिक जेवणाचा मनमुराद आनंद महिलांनी घेतला.
नऊवारी साड्या, नाकात नथ आणि पारंपरिक वेशभूषा करून सर्वजणी अगदी ताण तणाव विसरून मंगळागौरीच्या खेळांच्या कार्यक्रमात समरस झाल्या होत्या.
यातील अजून एक भाग म्हणजे आपले पारंपरिक खेळ आपणच जपले पाहिजे. त्याची माहिती आपणच पुढील पिढीला दिली पाहिजे. हे नुसते खेळ नाहीत तर प्रत्येक खेळामागे खेळातील गाण्यात एक मेसेज दडलेला आहे. ही संस्कृती, पारंपरिकता जपली जावी म्हणून हा कार्यक्रम घेतला गेला.
ही कोणतीही स्पर्धा नव्हती. मस्त एक संध्याकाळ स्वतःसाठी काही तास राखून ठेवून आपल्या पारंपरिक संस्कृतीचा वसा जपला जावा हा एकमेव उद्देश ठेवून बिइंग वुमनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.